बिलोली (शेषराव वाघमारे१३) : ग्रामपंचायत लोहगाव येथील सध्या कार्यरत ग्रामरोजगार सेवक भगवानराव हंडे यांच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात विविध तक्रारी व अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वैभवकुमार किशनराव लोहगांवकर यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामरोजगार सेवकाची सखोल चौकशी करून त्यांना पदावरून कार्यमुक्त करावे आणि त्यांच्या जागी शासनाच्या नियमांनुसार नवीन पात्र व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या कामकाजातील कथित अनियमिततेमुळे गावातील विकासकामे, मनरेगा योजनेंतर्गत मजुरांना मिळणारा रोजगार, कामांची नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या ग्रामरोजगार सेवकाच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, कामातील त्रुटी व अनियमितता आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांच्या तक्रारींची अधिकृत नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच आवश्यकतेनुसार सध्याच्या ग्रामरोजगार सेवकाला पदावरून कार्यमुक्त करून नवीन पात्र व्यक्तीची नियुक्ती पारदर्शक पद्धतीने करावी, नियुक्ती करताना शासनाच्या नियम व अटींचे पालन करावे आणि या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल अर्जदाराला देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांच्या हितासाठी योग्य ती चौकशी व नियमानुसार कार्यवाही न झाल्यास वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाकडे दाद मागावी लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, संबंधित विभागाचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनामुळे लोहगाव ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सेवकाच्या कामकाजाची चौकशी होणार का आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










