बिलोली | (शेषेराव वाघमारे)महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या एक ते सहा याद्यांमधून लाभ मिळालेला असतानाही त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा अद्याप कमी झालेला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जमाफी मिळूनही सातबारा उतारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ हजार ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. आधीच नैसर्गिक संकटे, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी मिळाल्यानंतरही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गौतम गावंडे, दीपक केसराळीकर, वैभव घाटे आणि श्याम साखरे यांनी तहसीलदार बिलोली तसेच उपविभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन सादर केले आहे.कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा विनामूल्य कमी करावा, संबंधित बँकांना तातडीने सूचना द्याव्यात, गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून विशेष मोहीम राबवावी, तसेच बोजा कमी करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही सातबारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.या निवेदनावर गौतम गावंडे, दीपक केसराळीकर, वैभव घाटे आणि श्याम साखरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









